देवगडमध्ये मुलीची आत्महत्या (फोटो- istockphoto)
देवगडमध्ये मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
पोलिसांना आढळून आली सुसाइड नोट
वाडा-कसबेवाडी येथील धक्कादायक घटना
देवगड: देवगड तालुक्यातील वाडा कसबेवाडी येथील एका १६ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा (Sucide News) संपवल्याची धक्कादायक घटना घडली. निशा शरद मेस्त्री असे मृत मुलीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी (दि, २३ मार्च) दुपारी २.३० ते सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली.
निशा घरात एकटी असताना तिने एका खोलीतील लाकडी वाशाला पांढऱ्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. दुपारी शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने नातेवाईकांना माहिती दिली, त्यानंतर नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. निशाचे शालेय शिक्षण पूर्ण झाले होते.
तिचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर तिची भावंडे सध्या शिक्षण घेत आहेत. मृत मुलीचे वडील शरद मोहन मेस्त्री (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सुसाईड नोट आढळली
आत्महत्येपूर्वी निशाने एक चिड्डी लिहून ठेवली होती. आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे तिने या चिड्डीत नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.






