हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना (फोटो सौजन्य-Gemini)
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाकाली वॉर्डमधील गौतम नगर परिसरातील रहिवासी २७ वर्षीय दीक्षा शुभम भडके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूला तिचा पती जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
मृत दीक्षा भडके हिचा पती शुभम भडके ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजता घरी आला आणि त्यांने त्याच्या पत्नीला जाळून घराबाहेरून दरवाजा बंद करून निघून गेला, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. आरडाओरडा झाल्यानंतर घरातील दार उघडल्यावर दीक्षा जळालेल्या अवस्थेत दिसली. तिला तात्काळ चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असतानाच ७ जानेवारी रोजी दीक्षाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांना सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून मृतकाच्या पतीला अटक करण्यात आली. शुभमने दिक्षाची हत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.
तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी सावकारांनी त्याला किडनी विकण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या प्रकरणाने राज्यात आणि देशात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत, ज्यात तामिळनाडूतील त्रिची येथील एका रुग्णालयात किडनी एक ते दीड कोटी रुपयांपर्यंत विकल्या जात असल्याचेही समाविष्ट आहे.
दरम्यान, पीडितांना फक्त ५ ते ८ लाख रुपये मिळत असल्याचे उघड झाले आहे. भारतातील किडनी दाता रॅकेटमधील पहिला किडनी प्राप्तकर्ता बंगळुरूमध्ये सापडला आहे. आरोपी डॉक्टरने हवालाद्वारे कोट्यवधी रुपये देशाबाहेर ट्रान्सफर केल्याचा पोलिसांना संशय आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या चंद्रपूरच्या शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणाबाबत स्थानिक गुन्हे शाखेला महत्त्वाची माहिती मिळाली आहे आणि पोलिस आता त्या दिशेने तपास करत आहेत. पहिला किडनी प्राप्तकर्ता पोलिसांसमोर हजर झाला आहे.






