
राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
याप्रकरणी राजीव गांधीनगर, पर्वती परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगरसेवक सूरज नथुराम लोखंडे, प्रिया शिवाजी गदादे, शिवाजी शिवा गदादे, प्रेमराज गदादे-पाटील, कुमार जाधव यांच्यासह अन्य सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी सर्व्हे क्रमांक १३२, पर्वती पायथा परिसरात विघ्नहर्ता इमारतीच्या मागे, नेर्लेकर हॉस्पिटलजवळ सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कॅनॉलच्या जागेवर घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश केल्याचा आरोप
पुणे महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या अभ्यासिका व ग्रंथालयात संबंधित नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तेथील साहित्याची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. तसेच, साहित्याची चोरी केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने संबंधितांना जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी सर्वांसमक्ष जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्वती पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नगरसेवक सूरज लोखंडे, नगरसेविका प्रिया गदादे-पाटील यांच्यासह १३ ते १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: अभ्यासिका व ग्रंथालयात अनधिकृत प्रवेश, तोडफोड, साहित्याचे नुकसान, चोरी आणि फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचे आरोप आहेत.
Ans: या प्रकरणी पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.