
भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक
अनारुल्ला मजहर उल्ला चौधरी (वय ३६, रा. चिखली), अब्दुल रहिम मजिद मोमीन (वय ३९, रा. कांदिवली, मुंबई) आणि समिउल्ला अजमतउल्ला खान (वय ३२, रा. मुंब्रा, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अनारुल्ला चौधरी हा चहाच्या टपरीवर काम करत होता. कौटुंबिक वादातून त्याला घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्याने अब्दुल आणि समिउल्ला या दोघांना पिंपरी-चिंचवडमध्ये बोलावून घेतले. तिघांनी कुदळवाडी येथील एका भंगार गोदामात चोरी करण्याचे नियोजन केले. त्यानुसार ते गोदामाच्या शोधात निघाले होते.
दरम्यान, तळवडे येथे भारती भालेकर यांच्या जागेत असलेल्या एका हॉटेलमध्ये ते चहा पिण्यासाठी थांबले. यावेळी त्यांनी हॉटेलचालकाकडे जागेच्या मालकीबाबत चौकशी केली. ही जागा भालेकर यांची असून, आपण येथे भाड्याने हॉटेल चालवत असल्याचे हॉटेलचालकाने सांगितले. त्यानंतर आरोपींनी हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या भालेकर यांच्या बंगल्याची पाहणी केली. या परिसरात एकच बंगला असून, तेथील बहुतांश खोल्या भाड्याने दिल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यानंतर त्यांनी भंगार गोदामाऐवजी बंगल्यात चोरी करण्याचा बेत आखला. बंगल्याच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून प्रवेशाचा मार्ग शोधून त्यांनी चोरीची योजना आखली.
टेरेसवरून बंगल्यात प्रवेश
१३ ऑक्टोबर रोजी पहाटे एकच्या सुमारास आरोपींनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून बंगल्याच्या टेरेसवर प्रवेश केला. तेथून पहिल्या मजल्यावरील खोलीत जाऊन झोपलेल्या भारती भालेकर यांचे हात-पाय आणि तोंड बांधले. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने, रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तू घेऊन त्यांनी पळ काढला. आरोपींनी ४८ लाख २५ हजार रुपये किमतीचे ६८ तोळे सोन्याचे दागिने, पाच लाख रुपये रोख, ३० हजार रुपयांचे चांदीचे दागिने, १० हजार रुपयांचा मोबाइल आणि पाच हजार रुपयांचे घड्याळ, असा एकूण ५३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चिखलीचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. त्यानुसार प्रथम अनारुल्ला चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने दोन साथीदारांसह चोरी केल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अब्दुल मोमीन आणि समिउल्ला खान यांनाही अटक केली. आरोपींकडून ७३ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या पैंजणांच्या तीन जोड्या, एक दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार, असा एकूण ५७ लाख ८७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या
१०० तोळे सोन्याच्या चर्चेला उधाण
तळवडे येथील या चोरीप्रकरणात सुमारे १०० तोळे सोने चोरून नेल्याची चर्चा परिसरात होती. तसेच, फिर्यादीत केवळ ६९ तोळे सोन्याचा उल्लेख करण्यास सांगितल्याचीही चर्चा होती. मात्र, पोलिसांनी आरोपींकडून फिर्यादीत नमूद केलेल्या सोन्यापेक्षा अधिक, म्हणजेच ७३ तोळे सोन्याचे दागिने जप्त केल्याने या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. चोरीला गेलेल्या सोन्याचे नेमके प्रमाण आणि जप्त केलेल्या दागिन्यांचा तपशील याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.
Ans: चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तू असा एकूण ५३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरला.
Ans: चिखली पोलिसांनी या प्रकरणात अनारुल्ला चौधरी, अब्दुल मोमीन आणि समिउल्ला खान या तिघांना अटक केली.
Ans: पोलिसांनी ७३ तोळे सोन्याचे दागिने आणि अन्य वस्तूंसह एकूण ५७ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.