संग्रहित फोटो
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. असातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणार्यावर गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थिनींनी गुरुवारी विद्यापीठात आंदोलन केले.
विद्यापीठात शिकणार्या एका विद्यार्थिनीसमोर मंगळवारी (दि. 25 मार्च) रात्री नऊच्या सुमारास एकाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिला सुरक्षा पर्यवेक्षक यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनी व तिच्या मैत्रिणींनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली. पण, प्रशासनाकडून मिळालेला थंड प्रतिसाद पाहून विद्यार्थिंनीनी एकत्र येत गुरुवारी सकाळी विद्यापीठात आंदोलन सुरू केले.
ही घटना घडल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने विद्यापीठाकडे संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली होती. कुलगुरु व कुलसचिवांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी या प्रकरणी कोणतीच कारवाई न केल्याने आम्हाला आंदोलन करून त्याकडे लक्ष्य वेधावे लागले आहे, असे संबंधित विद्यार्थिनीने व तिच्या मैत्रीनींनी स्पष्ट केले. विद्यापीठात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता, एका तरुणाने विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य केल्याची तक्रार प्राप्त झाली असून, या तरुणावर गुन्हा दाखल केला असल्याचे स्पष्ट केले. कर्तव्यायत निष्काळजीपणा करणार्या व चुकीचे वर्तन करणार्या कर्मचार्यांवर विद्यापीठ प्रशासन कायद्याप्रमाणे कडक कारवाई करीत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये, याबाबत विद्यापीठ सर्व ती खबरदारी घेत आहे, असे विद्यापीठातर्फे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.






