शेतकऱ्याकडून 25 हजारांची लाच घेणं भोवलं; महिला महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडले
इंदापूर : राज्यात लाच घेतल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. अशातचं आता इंदापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तसेचं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन २०२० पासून तहसीलदार यांच्याकडे दावा सुरू आहे. याबाबत तहसीलदार इंदापूर यांची सुनावणी होऊन निकाल देणे बाबतची प्रक्रिया बाकी होती. सदर निकालाची कागदपत्रे तक्रारदाराच्या बाजूने तयार करून द्यावे म्हणून कावेरी विजय खाडे (वय-४८ वर्षे) महसूल सहाय्यक वर्ग ३ तहसील कार्यालय इंदापूर, रा. संघवीनगर, भिगवन रोड, बारामती) यांनी ५० हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले.
त्याबाबत संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुरूप शुक्रवार (दि. २८) रोजी ५ वाजताच्या दरम्यान सापळा रचून संबंधित महसूल सहाय्यक कावेरी खाडे यांना २५ हजाराची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे, पोलीस उपाधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे, पोलीस हवालदार कैलास महामुनकर, वनिता गोरे, चंद्रकांत कदम यांनी केली.
‘जीएसटी’ कार्यालयातील कर निरीक्षकाला रंगेहात पकडलं
राज्यात लाच घेणाऱ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. लाच घेतल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कार्यालयातील कर निरीक्षकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागने पकडले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषारकुमार दत्तात्रय माळी (वय ३३) असे कर निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी माळी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत वकिलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती.
हे सुद्धा वाचा : खासदारकीपेक्षा तहसीलदार झालो असतो तर बरं झालं असतं; विशाल पाटील असं का म्हणाले?