
दारूच्या नशेत वाद, महिलेने दगडाने ठेचून एकाला संपवलं; पुणे जिल्ह्यातील घटनेनं खळबळ
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना सतत घडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कासारसाई येथे दारू पिऊन झालेल्या वादातून दगडाने डोक्यात व छातीत मारून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कासारसाई-कुसगाव रोडवरील कृष्ण मंदिरापुढील वनविभागाच्या जागेत घडली आहे.
हनुमंत सोपान शितोळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात मयुर जयवंत शितोळे (३०, कासारसाई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयवंता भगवंत तिडके (५०, कासारसाई) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हनुमंत सोपान शितोळे आणि आरोपी महिला हे दोघे कासारसाई येथील कृष्ण मंदिराच्या समोर असलेल्या वन विभागाच्या जागेत दारू प्यायला बसले होते. दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. या भांडणात हनुमंत यांनी आरोपीला मारहाण करून तिचा हात पिरगळला. याचा राग आल्याने आरोपीने तेथे पडलेला दगड उचलून हनुमंत यांच्या डोक्यात व छातीत जोराने मारला, ज्यामध्ये हनुमंत यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून
लातूर जिल्ह्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा राग मनात धरून तरुणाने साथीदारांच्या मदतीने तरुणीच्या वडिलांचा खून केल्याची गंभीर घटना मुखेड तालुक्यातील लादगा शिवारात घडली आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या तीन प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड आणि मुखेड पोलिसांच्या पथकाने अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले आहे. दापका राजा येथील किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा राग मनात धरून किशन जोगदंड याने आपल्या दोन साथीदारांसह संगनमत केले. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता लादगा शिवारातील शेतात फिर्यादीचे वडील बाबूपुंडलिक गायकवाड (वय ६०) यांच्यावर हल्ला करून त्यांचा जागीच खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या तोंडावर चाकूने वार करून तिलाही गंभीर जखमी केले.