संग्रहित फोटो
नाशिक : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून, वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एकतर्फी प्रेमातून एका विवाहितेचा विनयभंग करत तिच्या पतीला मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना नाशिकमधील दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दिगंबर आंधळे हा गेल्या एक ते दीड महिन्यापासून पीडित विवाहितेचा सतत पाठलाग करून तिला त्रास देत होता. काही दिवसांपूर्वी त्याने महिलेच्या कामाच्या ठिकाणी जाऊन “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत प्रेमाची मागणी घातली होती. त्यावेळी पीडित महिलेने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, “तू माझी झाली नाहीस तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही,” अशी धमकी त्याने दिली होती. पीडितेने या धमकीकडे दुर्लक्ष केले.
मात्र, सोमवारी सायंकाळच्या सुमारास संशयिताने थेट पीडितेचे घर गाठले. तेथे जाऊन त्याने पीडितेच्या पतीला “तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा. नाहीतर तुझ्या पत्नीवर आणि मुलावर अॅसिड हल्ला करेन किंवा त्यांचा अपघात घडवून आणेन,” अशी थेट धमकी दिली. पतीने या प्रकाराबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने पतीला मारहाण केली आणि पीडित महिलेचा विनयभंग केला आहे.
सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
सांगलीमध्ये इंजिनिअरिंगच्या 20 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे सांगली हादरले. विद्यार्थिनीच्या दोन मित्रांनीच हे भयंकर कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. एवढ्यावर न थांबता आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी दिली. तिने न घाबरता पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली तर दुसऱ्याचा शोध घेत आहेत.






