
डॉक्टरचे घर फोडले, लाखोंचे हिरे अन् सोन्याचे दागिने लंपास; मॉडेल कॉलनीतील घटना
पुणे : पुण्यात घरफोडीच्या घटना थांबत नसून शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी परिसरातील एका डॉक्टरांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९ लाख रुपये किमतीचे हिरे व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरमालक कामानिमित्त मुंबईला गेले असताना ही चोरी झाली आहे. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुख्य दरवाजा उघडा दिसल्याने चोरीचा प्रकार समोर आला.
याप्रकरणी डॉ. अशोक भालचंद्र भणगे (वय ७३) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. भणगे हे मॉडेल कॉलनीतील प्रराम सोसायटीत पत्नी रेणुका यांच्यासह राहतात. ते रूबी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्यांच्या पत्नी आर्किटेक्ट आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार (दि. २४ जुलै) सकाळी दोघेही कामानिमित्त मुंबईला गेले होते. दरम्यान त्यांच्या घरी सीसीटीव्ही आहेत. त्यांनी २६ जुलै रोजी पहाटे सुमारे ५.५५ वाजता मोबाईलवरून सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. त्यात त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली.
हे सुद्धा वाचा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या
सोसायटीतील रहिवासी घटनास्थळी पोहोचले असता सुरक्षा दरवाज्याचे कुलूप तसेच मुख्य दरवाज्याचे लॉक तोडलेले आढळले. घरातील दोन्ही बेडरूमचे कुलूप तोडून कपाटांमधील सामान अस्ताव्यस्त फेकण्यात आले होते. त्यानंतर डॉ. भणगे मुंबईहून पुण्यात परतल्यानंतर पाहणी केली असता घरातील मौल्यवान दागिने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या ऐवजात ४० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, दोन सोन्याच्या साखळ्या, हिऱ्याच्या बांगड्या, हिऱ्याचे कानातले, मोत्यांचा नेकलेस व कानातले, चार डायमंड अंगठ्या आणि दोन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश असून, या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश
हातात रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, खांद्यावर कचरा गोळा करण्याची पोती आणि चेहऱ्यावर निष्पाप भाव…पाहणाऱ्याला त्या केवळ कचरा वेचणाऱ्या महिला वाटाव्यात. मात्र या महिलांच्या हालचालींमागे सुरू होता एक धक्कादायक डाव. बंद घरांची रेकी करून संधी मिळताच घरफोडी करण्याचा उद्योग करणाऱ्या महिलांच्या टोळीचा आळेफाट्यात पर्दाफाश झाला आहे. आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या पाठीमागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरीचा डाव फसला आणि दोन महिलांना मुद्देमालासह पकडण्यात यश आले आहे.