File Photo : Accused Akshay Shinde
मुंबई : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील एक चिमुकली तीन वर्षे आठ महिन्यांची आहे. तर दुसरी चिमुकली ही सहा वर्षांची आहे. हा धक्कादायक प्रकार उजेडात येताच जमाव मोठ्या प्रमाणात संतप्त झाला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. असे असताना यातील आरोपी अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेदेखील वाचा : बदलापूर प्रकरणावर महिला नेत्या भडकल्या; अदिती तटकरेंसह सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया
बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सकाळपासून नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले. शेकडो नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूकही रोखून धरली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा गेल्या दोन तासांपासून ठप्प झाली होती. संपूर्ण बदलापुरात संतापाचे वातावरण आहे. यातच आरोपी अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
असा उघड झाला प्रकार
शाळेतून घरी आलेल्या या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होत असल्याचे सांगितले. तेव्हा संबंधित प्रकार उजेडात आला आहे. आरोपी अक्षय शिंदेने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती.
बदलापूर बंदची हाक
बदलापुरात अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. संतप्त पालकांनी शाळेच्या गेटवर आक्रमक होत आंदोलन सुरू केलं आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पालक आक्रमक झाले आहेत. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त शाळेच्या गेटवर तैनात करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : मनसेचा गृहमंत्री असता तर…; बदलापूरच्या घटनेवरुन अविनाश जाधव संतापले