सौजन्य - नवराष्ट्र टीम
ठाणे : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी गृह विभागाला लक्ष्य करीत संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणात अधिक गांभीर्याने लक्ष देऊन फास्ट ट्रॅकवर केस चालवली पाहिजे अशी मागणी करत इथे जर मनसेचा गृहमंत्री असता तर जागेवर एन्काऊण्टर केला असता, असा संताप जाधव यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्या गेल्या अनेक दिवसांपासून घटनेचा पाठपुरावा करत होत्या. जे घडले ते खूपच वाईट होते. असा मानसिकतेच्या लोकांचा एन्काऊंटर झाला पाहिजे. गृह खात्याने यांना ठोकले पाहिजे. लहान मुलींच्या अंगावर हात टाकण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. असंही जाधव म्हणाले.
बदलापूर शहरातील नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची घटना शनिवारी समोर आली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात तसेच इतर तपासाच्या आणि वैद्यकीय बाबींमध्ये आणि आरोपीला पकडण्यात बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे आणि पोलिस प्रशासनाने उदासीन भूमिका घेत विलंब केल्याचा आरोप काही सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मंगळवारी सकाळी बदलापूर स्टेशनवर हजारो महिलांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांनी लोकल ट्रेन रोखून धरल्या तसेच रिक्षा चालकांनीही रिक्षा बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.
बदलापूरमध्ये तणावाचे वातावरण
बदलापूर घटनेवरून नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. सकाळपासून नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले, शेकडो नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूकही रोखून धरल्याने मध्य रेल्वेची वाहतूकसेवा बंद पडली आहे. गेल्या दोन तासांपासून रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. संपूर्ण बदलापुरात संतापाचे वातावरण आहे.