संग्रहित फोटो
याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात २८ वर्षीय तरुण व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, तीन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे एनडीए रस्त्यावर मोरया ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे तक्रारदार दुकानात बसलेले होते. रात्री आठच्या सुमारास बसलेले असताना तिघेजन शस्त्रे घेऊन दुकानात शिरले. त्यांनी काऊंटर फोडत धमकावण्यास सुरूवात केली. तक्रारदारांना देखील मारहाण केली आणि दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. अचानक हा प्रकार सुरू झाल्यानंतर तक्रारदारांनी जखमी अवस्थेत विरोध करून आरडाओरडा केला. रहदारीचा रस्ता असल्याने मोठ्या संख्येने नागरिक जमा होऊ लागताच लुटमार करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान, अद्याप लुटमार करणाऱ्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. अधिक तपास पोलिस करत आहेत.
आणखी एका ठिकाणी लुटमारीचा प्रयत्न
सराफी ज्वेलर्सवरील प्रयत्न फसला असताना याच लुटमार करणाऱ्या टोळीने शिवणे भागात देखील एका सराफी दुकानावर शस्त्र घेऊन लुटमार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन घटना घडल्यानंतर देखील पोलिसांना या लुटमार करणाऱ्यांचा शोध लागलेला नसल्याचे दिसून येत आहे.
वडापाव सेंटरच्या मालकाला धमकी
गोडोली, अजंठा चौक सातारा येथे साईनाथ वडापाव सेंटरच्या मालकाला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा, अन्यथा दुकान चालू देणार नाही, तसेच ‘एकेकाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत तिघांनी दहशत माजवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, दुकानातील खुर्च्या, टेबल, भांडी फोडून नुकसान करण्यात आले आहे. याबाबतच्या गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलिसात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वडापाव सेंटरच्या गल्ल्यातील ४५०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन दुकान मालक व कामगाराला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली आणि आरोपी दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी सरिता जगदीश जाधव (रा. निशिगंधा कॉलनी, देगाव फाटा) यांनी इंदिरानगर झोपडपट्टी येथील रसिक धोत्रे व त्याच्या दोन साथीदारांविरोधात सातारा शहर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी खंडणी, शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जायपत्रे करत आहेत.






