(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
उन्हाळ्यात कैरीची चव चाखायला सगळेच उत्सुक असतात. परंतु कैरी आता हिवाळ्यात चाखायला मिळणार आहे. कारण आंबट-गोड नात्याची गोष्ट ‘कैरी’ या चित्रपटामधून उलघडणार आहे. हा मराठी मल्टीस्टारर सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पोस्टरच्या उत्सुकतेनंतर यांत आता भर घालत ‘कैरी’ चित्रपटाचा ट्रेलर देखील समोर आला आहे. आणि अनेक टर्न ट्विस्ट असलेला हा ट्रेलर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांना नवा अनुभव देणार आहे.
BIGG BOSS 19: ‘आप लोमड़ी हो…’ मीडियाने प्रश्न विचारताच संतापला गौरव, फरहानाला चांगलेच सुनावले
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोकणातील नयनरम्य, हिरव्यागार वातावरण हे सगळं दाखवण्यात आले आहे. तसेच ट्रेलरच्या सुरुवातीलाच शशांक आणि सायलीची लव्हेबल केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. कोकणाच्या हिरव्यागार परिसरात त्यांचा रोमँटिक प्रवास खुलताना दिसत आहे. इतकंच नाहीतर कोकणातील लग्नाचा थाटमाटही चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. आणि या जोडीच्या रोमँटिक प्रवासाला अचानक ब्रेक लागतो. ट्रेलरमध्ये मध्येच आलेला हा ट्विस्ट चित्रपटाच्या कथेची उत्सुकता वाढवत आहे. नवरा हरवला म्हणून पत्नीची सुरु असलेली घालमेल ट्रेलरमध्ये दिसत असून हा ट्विस्ट चित्रपटात काय रंगत आणणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
ट्रेलरमध्ये सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी आहे. तर शूटिंगची ठिकाणही नजरा वळवणारी आहेत. विशेषतः कोकणातील शूट साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. ‘कैरी’ या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. ‘लोच्या झाला रे’ आणि ‘शेर शिवराज’ या दोन ब्लॉकबस्टर व्यावसायिक अशा मराठी चित्रपटांनंतर ते ‘कैरी’ हा तिसरा सिनेमा घेऊन आले आहेत.
शिवाय ‘कैरी’ हा सिनेमा इन असोसिएशन विथ ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेंमेंट’चा आहे. तर ‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘कैरी’चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटाला निषाद गोलांबरे आणि पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. तर पार्श्वसंगीताची जबाबदारी साई पियूष यांनी सांभाळली. तर चित्रपटाचे छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. आणि चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.






