संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता सायबर चोरट्यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठाला लक्ष्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी भागातील एका डॉक्टर महिलेची ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६२ वर्षीय डॉक्टर महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या बिबवेवाडी भागातील श्री संत एकनाथनगर भागात राहायला आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. नंतर डॉक्टर महिला आणि त्यांच्या पतीच्या मोबाइलवर सायबर चोरट्याने एपीके फाईल पाठविली. सायबर चोरट्याने त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी हे ॲप मोबाइलमध्ये घेत बँक खात्याची माहिती त्यात दिली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्याने बिबवेवाडी भागातील एका बँकेच्या खात्यातून ७४ हजार रुपये लांबविले. खात्यातून पैसे लांबविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला २१ लाखांना गंडा
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची २१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ३९ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. माहितीनुसार, तक्रारदार महिला ओैंधमधील सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर मेसेज पाठवत शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली. तसेच, त्यांना गुंतवणूक केल्यास चांगला परातावा मिळेल, असे आमिष दाखविले. तक्रारदार महिला या आमिषाला बळी पडल्या. चोरट्यांनी त्यांना एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी महिनाभरात २१ लाख २० हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही, तसेच गुंतविलेली रक्कमही दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.






