संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धीरेंद्र पासवान (वय ३७, मूळ रा. लकुडी निसफराय, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील कुमार (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितेश राजेंद्र पाटील (वय ३९, रा. गणेशनगर, वडगाव शेरी ) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पासवान आणि आरोपी हे खासगी कंपनीकडून वाघोलीतील आव्हाळवाडी भागातील एका संस्थेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. दोघे जण संस्थेच्या आवारातील खोलीत राहायला आहेत. आरोपी आणि पासवान यांच्यात बुधवारी (१९ ऑगस्ट) रात्री वाद झाला. मध्यरात्री आरोपीने पासवान याच्या डोक्यात कठीण वस्तू मारुन त्याचा खून केला. गुरुवारी सकाळी पासवान हा खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेला आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत.
तिकीट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट विक्री केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार करुन रोकड लुटून नेल्याची प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून, चोरट्यांनी चाकूने वार केल्याने रेल्वे कर्मचारी जखमी झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल, तसेच तिकिट विक्रीतून जमा झालेली २६ हजारांची रोकड असा ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






