
हिंगोलीच्या तरुणाचा यवतमाळ जिल्ह्यात खून; सहा लाख रुपयांची सुपारी देऊन संपवलं
हिंगोली : हिंगोली शहरातून बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय तरुणाचा यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सत्तरमाळ जंगलात निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सहा लाख रुपयांची सुपारी घेऊन हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले असून, याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करीत हत्येचा उलगडा केला.
हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर भागातील मंगेश उर्फ काल्या मनवर (वय २३) हा २ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी मंगेश बेपत्ता असल्याची तक्रार हिंगोली शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सत्तरमाळ जंगलात एका तरुणाचा अनोळखी मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले.
मयत तरुण होता बेपत्ता
तपासादरम्यान हा मृतदेह हिंगोलीतून बेपत्ता झालेल्या मंगेश मनवर याचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर यवतमाळचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पथके तयार करण्यात आली. तपासाचे धागेदोरे हिंगोलीपर्यंत पोहोचल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक हिंगोलीत दाखल झाले. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे जमादार अशोक धामणे यांच्या मदतीने पोलिसांनी आवश्यक माहिती संकलित केली.
हे सुद्धा वाचा : पिस्तूल विक्रीचा डाव उधळला, गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चौघांना ठोकल्या बेड्या
आठ संशयित पोलिसांच्या ताब्यात
या घटनेच्या तपासातून ज्ञानेश्वर राठोड, राहुल लोखंडे, श्रावण भवाळ, सोमनाथ हजारे, विशाल राठोड, अर्जुन शेळके, दीपक जाधव आणि सिद्धार्थ जाधव (सर्व रा. वाशिम) यांची नावे समोर आली. पोलिसांनी आठही संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांची चौकशी केली असता सहा लाख रुपयांच्या मोबदल्यात मंगेशचा खून करण्याची सुपारी घेतल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हा खून नेमका कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खंडाळा पोलिसांकडून सुरू असून, हत्येमागील सूत्रधार आणि खुनाचा नेमका उद्देश तपासातून स्पष्ट होणार आहे.