
सततच्या छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सिन्नर : सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशांचे आमीष दाखवून, धमकावून तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्यात आला. इतकेच नव्हे, तर या नराधमांच्या सततच्या मानसिक छळाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर या निष्पाप अल्पवयीन मुलीने गुरुवारी (दि. २) आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.
यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी मुख्य संशयिताच्या मामा-मामीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. आमदार देवयानी फरांदे यांनी शुक्रवारी (दि. ३) विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून देण्याची आणि या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
पीडितेच्या आईला शिवीगाळ
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव येथील आदर्शनगरमध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीची मुख्य आरोपी मेहताब शमशाद खान याच्याशी ओळख होती. मेहताबने मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत, तिला पैशांचे आमिष दाखवले आणि धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा पीडितेच्या आईला हा प्रकार समजला. त्यानंतर पीडितेच्या आईने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मेहताबने फोनवरून फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली.
संशयितांकडून आईला जीवे मारण्याची धमकी
पीडितेच्या आईने इतर आरोपी शब्बीर सुब्राती मोहम्मद, अशिया शब्बीर मोहम्मद, अशगरी मुक्तार खान आणि मुक्तार खान (सर्व मूळ रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश; सध्या रा. माळेगाव, सिन्नर) यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी चूक मान्य करण्याऐवजी उलट फिर्यादीशीच वाद घालून त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली.
…अखेर संपवले जीवन
इतर आरोपींनी मुख्य आरोपी मेहताब याला या कृत्यासाठी आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सातत्याने चिथावणी दिली. आरोपींकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्या, मानसिक छळ आणि जाचाला कंटाळून अखेर १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या आईने मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.