संग्रहित फोटो
देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गस्तीवरील पोलिसांना ओमकार सोसायटी परिसरात एकाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. पोलीस दाखल झाले त्यावेळी आकाश रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला आढळला. तर, दुसऱ्या मजल्यावरील खोलीत शुभांगी गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून शुभांगी हिला मृत घोषित केले. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आकाशवर उपचार सुरू आहेत.
वर्षभरापासून वाद
आकाश हा आयटी इंजिनिअर असून हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीत नोकरीला आहे. शुभांगी खासगी कंपनीत नोकरीला होती. दोघांचा डिसेंबर २०२३ मध्ये विवाह झाला होता. चार ते पाच महिन्यांपासून ते ओमकार सोसायटीत भाड्याने राहत होते. प्राथमिक चौकशीत दोघांत वर्षभरापासून वाद सुरू असल्याचे समोर आले. याच वादातून आकाशने शुभांगीवर शस्त्राने वार केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून खाली उडी मारल्याचे समोर आले आहे.






