संग्रहित फोटो
माळेगाव : माळेगाव येथील शिवनगर परिसरात घरासमोरील सिमेंटच्या विटांचे कंपाउंड ट्रॅक्टरने धडक देऊन पाडल्याच्या कारणावरून झालेल्या वादात पाच जणांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार माळेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी रणजीत ढोले, सुजित ढोले, तेजम ढोले, सुनिल ढोले आणि बाळासो ढोले या पाचही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिवनगर, माळेगाव येथे घडली आहे. फिर्यादी अविनाश बाळकृष्ण नरूटे यांच्या घरासमोरील कंपाउंडला आरोपी रणजीत लालासो ढोले याने नंबर नसलेल्या ट्रॅक्टरच्या लोखंडी फरांडीने वारंवार धडक दिल्याने कंपाउंडचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कंपाउंडचे नुकसान होत असल्याचे पाहून अविनाश नरूटे व त्यांचा भाऊ नंदकिशोर हे ट्रॅक्टर थांबविण्यासाठी गेले. त्यावेळी रणजीत ढोले याने ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे गंभीर दुखापत अथवा जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. यानंतर सुजित लालासो ढोले, तेजम सुनिल ढोले, सुनिल शंकर ढोले आणि बाळासो शंकर ढोले यांनी अविनाश नरूटे, त्यांचा भाऊ नंदकिशोर, वडील बाळकृष्ण आणि आई सुजाता यांना दगड व हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ११०, ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रणजीत ढोले, सुजित ढोले, तेजम ढोले, सुनिल ढोले आणि बाळासो ढोले या पाचही आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार लोंढे यांनी केली.
हे सुद्धा वाचा : वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा






