Photo Credit- Social Media नागपूर हिंसाचारातील कथित मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई सुरू
नागपूर: मागील सोमवारी (17 मार्च) महाल आणि हंसापुरी येथे झालेल्या दंगल आणि जाळपोळीच्या घटनेचा मुख्य आरोपी फहीम खान याला पोलिसांनंतर आता प्रशासनाकडूनही मोठा फटका बसणार आहे. नागपुरातील यशोधरानगरमधील संजयबाग कॉलनीतील त्याच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेने त्याला नोटीस जारी कऱण्यात आली. या नोटीसीनंतर आज त्याच्या घरावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी बुलडोझरची कारवाई सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेशप्रमाणेच नागपुरातही गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याच्या दृष्टीने ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे. नागपूर महानगरपालिकेच्या पथकाकडून फहीम खानच्या घरावर तोडकामाची कारवाई प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, तोडकामापूर्वी फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी रात्रीच घर रिकामे केले होते. हे घर फहीम खानच्या आईच्या नावावर होते. यासोबतच EWS योजनेअंतर्गत NITने खान कुटुंबाला ही जागा 30 वर्षांच्या लीजवर दिली होती. कारवाईपूर्वी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी, यासाठी यशोधरानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे.
सरकारचा दंगेखोरांना इशारा, दोन दुकाने सील
हिंसाचारानंतर नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 20 मार्चला फहीम खानच्या घराची पाहणी करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या उल्लंघनाचा अहवाल सादर केला होता. या घरासाठी कोणताही अधिकृत बांधकाम परवाना मंजूर करण्यात आलेला नसल्यामुळे हे अनधिकृत बांधकाम असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला होता. नागपूर पोलिसांनी फहीम खानच्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शी संबंधित दंगलखोरांनी वापरलेली दोन दुकानांना टाळे लावले. त्यानंतर आता नागपूर महापालिकेने दोन जेसीबीच्या मदतीने फहीम खानच्या घरावर तोडकाम कारवाई सुरू केली आहे.
सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून ही कारवाई सुरू असून, संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेने 21 मार्च रोजी फहीम खानच्या आईच्या नावावर असलेल्या 86.48 चौरस मीटरच्या बेकायदेशीर घरावर नोटीस बजावली होती. आता ही कारवाई वेगाने सुरू असून, यामधून सरकारने दंगेखोरांना कठोर इशारा दिल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बुलडोझर कारवाईचा इशारा दिला होता. ‘हिंसाचारात सहभागी असलेल्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. विशेषतः ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांना करावी लागेल. त्याची मालमत्ताही जप्त केली जाईल. जिथे बुलडोझर चालवण्याची गरज असेल तिथे बुलडोझर चालवला जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही.’ असा इशारा फडणवीसांनी दिला होता.