संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू (संग्रहित फोटो)
संभाजीनगर : पैठण येथील छत्रपती पंपाजवळ कार आणि दुचाकीचा शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या झालेल्या अपघातात पैठण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे (वय ५२) आणि सहशिक्षक संभाजी कर्डीले (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेवगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारने (एमएच १७ एझेड १०४५) शशिविहारकडे वळण घेत असलेल्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कारने दुचाकीस्वारांना तब्बल ५०-६० फूट फरफटत नेले. कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. गंभीर जखमींना महेंद्र साळवे, स्वप्नील साळवे व फिरोज खान यांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने पैठण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, संत एकनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन सचिन घायाळ, नगरसेवक भूषण कावसनकर, गणेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर घटनास्थळी दाखल झाले.
शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार
शनिवारी सकाळी शवविच्छेदनानंतर भाऊसाहेब पिसे यांच्यावर आवडे उंचेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव गोमारे वाच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलिस करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच मुख्याध्यापकपदाचा पदभार
जिल्हा परिषदेचे शिक्षक संभाजी कडीले यानी पैठण तालुक्यातील नानेगाव पूसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार हा दोन दिवसांपूर्वीच स्विकारला होता. त्यांची पत्नीही जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे तर मुलगा वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे.
पिसे कुटुंबावर दु:खाचा डोंगर
पैठण नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब पिसे यांच्या वडिलांचे निधन अवघ्या १५ दिवसांपूर्वीच झाले होते. या दुःखातून सावरत असतानाच आता विसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.