संग्रहित फोटो
पुणे : स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसरी विभागातील भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण (देयके व महसूल) उपविभागात स्मार्ट मीटरची सील तोडून ‘सीटी बायपास’च्या माध्यमातून मीटरची गती कमी करून वीजचोरी केल्याची १९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी नऊ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधितांकडून एकूण १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे. उर्वरित दहा प्रकरणांत दंडाची आकारणी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मीटरमध्ये केलेली छेडछाड महावितरणच्या तपासणीदरम्यान उघडकीस आली आहे. मीटरचे सील तोडणे, कव्हर उघडणे तसेच सीटी प्रणालीला बगल देऊन प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा कमी वापर नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे स्मार्ट मीटरला चकवा देऊन वीजचोरी करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी कारवाई केली जात आहे.
रिमोट उपकरणाद्वारे छेडछाड
चाऱ्होली येथील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट’ या व्यावसायिक वीज ग्राहकाच्या ठिकाणीही मीटरमध्ये गंभीर स्वरूपाची छेडछाड आढळली आहे. वीजचोरीसाठी स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने रिमोट उपकरण बसविल्याचे तपासणीमध्ये समोर आले. या प्रकरणात २ लाख ६६ हजार ८०० रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे.
छेडछाड केल्यास फौजदारी कारवाई
वीजचोरी करण्याच्या उद्देशाने मीटरमध्ये छेडछाड करणे, सील तोडणे किंवा सीटी बायपास करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार आहे. भारतीय विद्युत अधिनियम, २००३ मधील संबंधित तरतुदींनुसार अशा प्रकरणांत दंडात्मक आकारणीसोबत फौजदारी गुन्हा दाखल केला जात आहे, अशी माहिती महावितरणने दिली.
महावितरणकडून नागरिकांना इशारा
स्मार्ट मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न केल्यास दंडात्मक आकारणीसह फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल. दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलिस ठाण्यांत नऊ ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर एकूण १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे.
नऊ वीजचोरी प्रकरणांत कारवाई
| ग्राहक. | दंडाची रक्कम |
|---|---|
| शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट, चाऱ्होली. | २,६६,८०० |
| सचिन भास्करराव तायडे. | १,१८,३६० |
| सुरज संजीवकुमार सूर्यवंशी. | १,५३,७७० |
| दयानंद श्रीमंत रसाळ. | १,४६,०७० |
| संदीप लक्ष्मण गवळी. | १,५६,५९० |
| विष्णू सखाराम चोपडे. | १,४०,४१० |
| भगवत नारायण इंगळे. | १,४६,६५० |
| आनंद जी. | ६८,८६३ |
| ब्रिजेशदादा बाळासो बुतुगडे | ४३,६२२ |
| एकूण. | १२,४१,१४५ |






