फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अमरावती : अमरावतीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घर काम करणाऱ्या एका नेपाळी संशयित महिलेला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र त्या महिलेला गुन्हा कबुल करण्यासाठी पोलिसांनीच जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अत्यंत अमानुषपणे मारुन आणि विजेचा शॉक देऊन पोलिसांनी हा महिलेला मारहाण केली आहे. याबाबत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तक्रार दाखल करत आवाज उठवला आहे.
अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. संशयित महिलेला गाडगेनगर पोलीस ठाण्यातील पोलीसांनी अटक केली. ताब्यात घेऊन गुन्हा कबूल करण्यासाठी महिलेच्या पायाला विजेचा शॉक देऊन व बांधून अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या धक्कादायक प्रकाराची माहिती महिलेने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना देत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे केली आहे.
पोलिसांकडून अमानुष मारहाण
अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातपुते यांच्या घरी घर काम करणाऱ्या सीतली थापा नामक नेपाळी महिले विरुद्ध सोन्याची चेन चोरी केल्याची तक्रार करण्यात आली. मात्र महिलेचे कुठलेही म्हणणं ऐकून न घेता महिलेला पोलीस ठाण्यात बोलावून बेशुद्ध होईपर्यंत बेदमपणे मारहाण केली. तसेच विजेचा शॉक सुद्धा पोलिसांनी दिला असा आरोप करण्यात आला आहे. मात्र सातपुते यांच्या घरचे मंगळसूत्र अखेर सायंकाळी घरी सापडल्याने पोलिसांनी या महिलेविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मात्र त्यादरम्यानच्या काळात अमानुष मारहाण या महिलेला केली आहे. मात्र कुठल्याही प्रकारची चोरी महिलेने केली नाही तरी देखील मारहाण केल्याने पोलिसांन विरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. तर या वेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी प्रतिक्रिया देत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू असे त्यांनी सांगितले. सात वर्षाखालील शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करू नये असे न्यायालयाचे आदेश आहेत इथे तर महिलेवर गुन्हा दाखल नसताना अमानुष मारहाण पोलिसांनी केल्याने गाडगे नगर पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे.