नर्सची गळफास घेऊन आत्महत्या, जातीवाचक शिवीगाळ अन् (Photo Credit- X)
मृत सारिका अशोक कदम (27) यांच्या आई बारकुबाई सोपान पवार (52, रा. दासखेडा, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारीनुसार, सारिका या एमजीएम रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्या पती अशोक कदम याच्यासोबत अरुणोदय कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होत्या. 1 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथील आळंदी येथे त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर 7 डिसेंबर 2025 रोजी दोघांनी कोर्ट मॅरेजची नोंदणी केली होती. सुरुवातीचे काही महिने संसार सुरळीत सुरू होता.
लग्नानंतर काही महिन्यांतच पती अशोक कदम, सासरे अंकुश कदम व सासू रुख्मिणीबाई कदम यांनी कारचे कर्ज फेडण्यासाठी तसेच नवी टुरिस्ट गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीचा संसार टिकावा म्हणून तिच्या वडिलांनी प्रथम 50 हजार रुपये व नंतर 25 हजार रुपये दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
काही दिवसांनी पतीने सारिकाचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून तिच्या पगारातील पैसे काढून आई-वडिलांना दिले, याबाबत जाब विचारल्यावर तिला मारहाण करण्यात आली. ‘तू खालच्या जातीची आहेस, तुला आमच्या घरी राहायची लायकी नाही’ अशा शब्दांत वारंवार शिवीगाळ करण्यात येत होती.
सततचा मानसिक छळ, पैशांची मागणी व अपमान यामुळे सारिका तणावाखाली होत्या. अखेर 14 मार्च रोजी पहाटे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शहरात येत एमजीएम रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर घाटीत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, याप्रकरणी सिडको पोलिस पुढील तपास करत आहे.
या प्रकरणी मृताच्या आईच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे करीत आहेत.






