हातात चाकू घेऊन फिरणाऱ्यांना नागरिकांनी चांगलंच चोपलं; तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं(Photo : iStock)
अमरावती : सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चित्रा चौकात चाकू घेऊन दहशत पसरविणाऱ्या चार तरुणांना नागरिकांनी चोप दिला. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी शुभम अशोक साहू (वय 25, रतनगंज), नितेश राजेश साहू (वय 25, रतनंज, दुसरा नागोबा), हर्ष शाम साहू (वय 23, रा. मच्छीसाठ) आणि गौरव राजेश साहू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहर कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार रफिक खान रशीद खान हे शुकवारी (दि. 14) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास इतर कर्मचाऱ्यांसह गस्त घालत होते. यावेळी चित्रा चौकात चार तरुण चाकूचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी दहशत निर्माण करणाऱ्या चार तरुणांना काही लोक मारहाण करत होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शुभम साहू, नितीन साहू, हर्ष साहू आणि गौरव साहू यांना ताब्यात घेतले.
हेदेखील वाचा : पुण्यात तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण, लाथाबुक्क्याही मारल्या; धक्कादायक कारणही समोर
यामध्ये एक आरोपी गर्दीचा फायदा घेत पळून गेला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिस कर्मचारी रफिक खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
राज्यात वाढलंय गुन्हेगारीचे प्रमाण
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच पुण्यात नुकतेच प्रेमसंबंघाच्या संशयातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सुखसागरनगर परिसरात घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यानंतर आता दहशत माजवणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.