संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रेमसंबंघाच्या संशयातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सुखसागरनगर परिसरात घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
ऋषीकेश दीपक खोपडे (वय २६, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रणव प्रशांत जगताप (वय २५, रा. बिबवेवाडी), सार्थक संतोष भोर (वय २१, रा. धनकवडी), कुमार तुळशीराम भागवत (वय २४), अमर अशोक लोंढे (वय २०, दोघे रा. कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, खोपडे याचे तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. रात्री साडेदहाच्या सुमारास खोपडे सुखसागनर परिसरातून निघाला होता. त्यावेळी आरोपी जगताप, भोर, भागवत, लोंढे यांनी खोपडेला अडवले. त्याला लाथाबु्क्क्यांनी, तसेच दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत खोपडे गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रऊफ शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. खोपडेला रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. सहायक निरीक्षक विकास बाबर अधिक तपास करत आहेत.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना गेल्या काही दिवसाखाली पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.
तरुणाला जिवे मारण्याची धमकी
धानोरीत वाद विवादातून तरुणाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विकी लक्ष्मण जाधव (वय ३०, रा. गोकुळनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी ओंकारसिंग भोंड, गुरुदीपसिंग भोंड, जयदीपसिंग भोंड, गुरुबचन भोंड यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला. आरोपी वराह पालनाचा व्यवसाय करतात. जाधव यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत त्यांनी वराह पालन व्यवासाय सुरू केला. जाधव यांनी आरोपींना मनाई केली. त्यानंतर आरोपींनी जाधव यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक सुडके तपास करत आहेत.