सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्... (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मुंबई : घाटकोपरमध्ये ३५ वर्षीय सपना घानजी यांच्या मृत्यूचा धक्कादायक उलगडा झाला आहे. सुनेची हत्या करण्यासाठी सासू धनलक्ष्मी घानजी (वय ६५) यांनी घरकाम करणाऱ्या महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले. याप्रकरणी सासूसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
सपना यांचा मृतदेह रविवारी रात्री घरातील बाथरुममध्ये आढळला. सुरुवातीला त्या बाथरुममध्ये घसरून पडल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, त्यांच्या गळ्यावर काळे-निळे वळ आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळल्याने पोलिसांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे तपास केल्यानंतर हत्येचा कट उघडकीस आला. सपना यांनी २०२४ मध्ये सासरच्यांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार केली होती. त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबाबत सासूला संशय असल्याचेही तपासात समोर आले आहे.
घरगुती छळाची होती तक्रार
पोलिसांच्या माहितीनुसार, धनलक्ष्मी यांनी घरकाम करणाऱ्या मंगला जाधव हिला तीन लाख रुपये देण्याचे कबूल केले. या कटात मंगलाचा पती सुरेश, मुलगी शिवानी (वय २१) आणि मुलगा साजन (वय १९) सहभागी झाले. रविवारी भांडण मिटवण्याच्या बहाण्याने धनलक्ष्मी सपना यांच्या घरी गेल्या. त्यानंतर आरोपींनी सपना यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, काचेच्या ग्लासने डोक्यावर प्रहार केला आणि ओढणीने गळा आवळला. त्यानंतर गळ्यावर पाय दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
विद्यार्थ्यांनी केली मुख्याध्यापिकेची हत्या
तेलंगणातील एका शाळेच्या मुख्याध्यापिका कल्लू रूपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणात दहावीतील 2 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रूपा रेड्डी या कोंडा मल्लेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका होत्या. १२ ऑगस्टला सकाळी त्या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या शरीरावर चाकूने २७ वार करण्यात आले होते.






