सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : निलेश घायवळच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यातील कुख्यात गुंडगिरी प्रकरणांमध्ये नाव आल्यानंतर आता त्याचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांनी याबाबतची अधिकृत ऑर्डर जारी केली आहे, अशी माहिती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे घायवळच्या परदेश प्रवासावर पूर्णविराम लागला आहे.
गेल्या काही महिन्यांत घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर कारवाई करताना पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, न्यायालयीन प्रक्रियाही सुरू आहे. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो परदेशात पसार झाला आहे. त्यासाठी त्याने चालाखी करून, पुण्याऐवजी अहिल्यानगर येथून काढलेल्या पासपोर्टचा वापर केला आहे. तो पासपोर्ट काढतांना त्याने त्याच्याविरूध्द असलेले गंभीर गुन्हे लपवले होते. त्यावरून चांगलाच गदारोळ उडाला होता. अहिल्यानगर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर त्याच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती.
पोलिसांनी घायवळविरोधात दाखल गुन्हे, चालू तपास आणि त्याच्या हालचालींबाबत माहिती प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला पाठवली होती. संबंधित नोंदींचा आढावा घेतल्यानंतर पासपोर्ट कायदा कलम १० (३) अंतर्गत ही रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. आदेशाची प्रत पुणे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. पासपोर्ट रद्द झाल्यानंतर निलेश घायवळ आता परदेश प्रवास करू शकणार नाही. तसेच, त्याच्याविरुद्ध चालू असलेल्या प्रकरणांमध्ये त्याची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी पोलिस आणि न्यायालयाकडून पुढील कारवाई वेगाने होण्याची शक्यता आहे.
निलेश घायवळचे नाव पुण्यातील व अन्य जिल्ह्यातील, गंभीर गुन्हे खंडणी व वर्चस्वासाठी सुरु असलेल्या गुन्हेगारी व्यवहारात वारंवार पुढे आले आहे. पुण्यासह ठिकठिकाणी त्याची टोळी सक्रिय होती. मात्र मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याच निकटच्या व्यक्तीवर गोळीबार केल्याने घायवळ व त्याच्या टोळीविरूध्द आता वेगाने कारवाई करण्यात येत आहे.






