सौजन्य - नवराष्ट्र टीम
यावेळी भाषणात विश्वास पाटील यांनी पुण्यातील वाचन संस्कृती तसेच मोबाईलचा सध्या होणारा अतिवापर आणि खास कोल्हापुरी फटकेबाजी करत अनेक मुद्दे मांडले. भाषणावेळी विश्वास पाटील म्हणाले, “आधुनिक काळात गावाची ओळख त्या गावात काय घडतं, यावर अवलंबून असते. मुळा मुठेच्या किनारी हा ज्ञानयज्ञ थाटलेला आहे. अशा पद्धतीचा पुस्तक महोत्सव केवळ दिल्ली आणि कलकत्ता येथेच होतो. अवघ्या दोन वर्षात पुणे पुस्तक महोत्सवाने या दोन्ही महोत्सवाची बरोबरी केली आहे. ५० वर्षाने पुणे पुस्तक महोत्सव कुणी सुरू केला, असा प्रश्न आल्यास. नागरिक राजेश पांडे आणि मिलिंद मराठे यांची नावे घेतील.” “एक दोन ठिकाणी मी गंमतीने म्हणालेलो आहे की, पुण्यात जे काम 500 “देशपांड्यांना” जमणार नाही ते एकटे राजेश पांडे करत असतो. सळसळ लागते एवढे सगळे करायला,” असे ही ते म्हणाले.
राजकीय मुद्दे मांडत असताना विश्वास पाटील म्हणाले, “राजकारण डावपेच करण्या अगोदर कुस्ती डावपेच शिकतात, अगोदर ते शिकावे लागते यात मोहोळ, लांडगे हे आधी दोघे शिकले आणि नंतर राजकारणात आले. चंद्रकांत पाटील कोल्हापूर तालमीत शिकले आणि पुण्यात का आणले कारण पुण्याच्या वैभवात भर घालण्यासाठी आणलेले असावे, पंचवटीच्या नदीत वाढलेले रोपटं मुळा-मुठेमध्ये वाढलं तर त्याचा वटवृक्ष होतो.”
वाचन संस्कृती बद्दल मत मांडताना ते म्हणाले, “आजच्या काळात प्रत्येक भारतीय सरासरी सहा तास मोबाईलवर घालवत असल्याने एक गंभीर धोका निर्माण झाला आहे. ज्या वेळी लोक मोबाईलच्या स्क्रीनचे गुलाम होत चालले आहेत, त्यावेळी असे पुस्तक महोत्सव लोकांना केवळ पुस्तके खरेदी करण्याचीच नव्हे, तर विचारांची देवाणघेवाण करण्याचीही आशा आणि व्यासपीठ देतात.”
ज्ञान प्रणाली ग्रंथ दिंडीचे पुण्यात आयोजन
पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात झाली. शनिवारचे औचित्य साधत मोठया संख्येने पुणेकरांनी पहिल्याच दिवशी या महोत्सवाला भेट दिली. तत्पूर्वी मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथून ज्ञानप्रणाली ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये पुण्यातील दीडशे महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या ग्रंथदिंडीला मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वज दाखवून सुरुवात करण्यात आली. या दिंडी मध्ये पारंपारिक खेळासह विज्ञानावर आधारित देखावे पाहायला मिळाले. शहरातील जंगली महाराज रोड ते फर्ग्युसन महाविद्यालयापर्यत ही ज्ञान प्रणाली ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
पुणे पुस्तक महोत्सवात पहिला विश्वविक्रम
पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वीच “लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स” हा विश्वविक्रम गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये प्रस्थापित करण्यात आला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात शनिवारपासून झाली. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजासाठी थोर काम केलेल्या भगवान बिरसा मुंडा यांचे विशेष दालन उभारण्यात आले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी लाखो आदिवासी शब्दांच्या साहाय्याने पोस्टर प्रदर्शित करून, विश्वविक्रम जाहीर करण्यात आला आहे.
लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम यापूर्वी अमेरिकेच्या नावावर होता. अमेरिकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये १३६५ पोस्टर्सच्या सहाय्याने हा विक्रम केला होता आता हाच विषय उपक्रम पुणे पुस्तक महोत्सवात मोडीत निघाला. १६७८ पोस्टर्स च्या सहाय्याने नवा लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला.






