पुण्यात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले (फोटो- istockphoto)
पुणे: शेअर बाजारात गुंतवणुक केल्यानंतर चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची २१ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ३२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत एक मॅसेज पाठविला होता. त्यात गुंतवणूकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखविले होते. या मॅसेजनुसार तरुणाने संपर्क साधला. तेव्हा त्याला एक ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. त्यात गुंतवणूकीची माहिती देण्यात येत होती. तसेच, नफेबाबतही सांगण्यात येत होते. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. या आमिषाला तरूण बळी पडला. चोरट्यांनी तरुणाला बँक खात्यात वेळोवेळी २१ लाख रुपये बँक जमा करण्यास सांगितले. तरुणाने पैसे जमा केले, पण, त्याला परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास करत आहेत.
ट्रेडींगच्या बहाण्याने ८ लाखांची फसवणूक
बाणेरमधील तरुणाला ट्रेडींगच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी सव्वा सात लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ३४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. या तरुणाला देखील मोबाईलद्वारे संपर्क साधत बेनिफिशिअरी बँक खात्यात ७ लाख ४० हजार रुपये पाठवण्यास भाग पाडून फसवले आहे.
तरुणाची २५ लाखांची फसवणूक
शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गोखलेनगर परिसरातील तरुणाला तब्बल २५ लाख ६० हजार रुपयांना फसविले आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ३१ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणाला देखील सायबर चोरट्यांनी मोबाईलवर शेअर ट्रेडिंगचा मॅसेज पाठवून जाळ्यात ओढल्याचे दिसत आहे. मोठा फायदा तसेच शेअर बाजारी माहिती देऊन सायबर चोरटे नागरिकांचा विश्वास संपादन करतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: Cyber Crime: पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोन महिलांची मोठी फसवणूक; तब्बल ४६ लाखांना घातला गंडा
पुण्यात दोन महिलांची ४६ लाखांची फसवणूक
पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. हीट अँड रन, कोयता गॅंग, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान पुणे पोलीस गुन्हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत. कडक कारवाई देखील करत आहेत. मात्र अशा गुन्ह्यासोबतच आता सायबर क्राईमचे गुन्हे देखील वाढताना दिसत आहेत. पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. सायबर चोरट्यांकडून सातत्याने फसवणूकीचे सत्र सुरू असून, दोन महिलांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.