संग्रहित फोटो
पुणे : सायबर चोरट्यांनी पुन्हा एका जेष्ठ नागरिकाला ‘तुम्हाला कोर्टाच्या परवानगीने डिजिटल अरेस्ट केले आहे’ अशी बतावणी करून तब्बल २ कोटी ७४ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांना एक-दोन दिवस नव्हे तर दोन महिने भीतीच्या छायेत ठेवत त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेतले आहेत. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. याबाबत कोथरूडमध्ये राहणाऱ्या ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित ज्येष्ठ नागरिक मुंबईतील एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ते पत्नीसमवेत कोथरूड परिसरात वास्तव्यास आहेत. दरम्यान जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांना तुमच्या बँक खात्याचा व आधार कार्डचा वापर करून मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप केला. तसेच याप्रकरणी सीबीआयकडे गुन्हा दाखल असल्याचीही बतावणी केली.
नंतर दुसऱ्या एका सायबर चोरट्याने स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून ओळख करून देत संवाद साधला. त्यांना “तुम्हाला कोर्टाच्या परवानगीने डिजिटल अरेस्ट केले आहे,” असे सांगितले. त्याचबरोबर, “तुमच्या मोबाइलमध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहे. तुम्ही काय बोलता किंवा फोनपासून दूर गेला, तर आम्हाला लगेच माहिती मिळते,” असा धाकही दाखवला. या धमक्यांमुळे घाबरलेले ज्येष्ठ नागरिक प्रचंड दबावाखाली होते. त्यांनी भीतीपोटी हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. ते जवळपास दोन महिने घरातच राहिले. त्यांनी आपल्या पत्नीपासूनही ही बाब लपवून ठेवली होती. दरम्यान, बँक खात्यांची पडताळणी करण्यासाठी सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या विविध खात्यांमध्ये त्यांनी हळूहळू २ कोटी ७४ लाख रुपये पाठवले. मात्र दोन महिने उलटल्यानंतर पत्नीला पतीच्या वागण्यात झालेला बदल जाणवू लागला. त्यांनी याबाबत विचारपूस केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी अखेर डिजिटल अरेस्टचा संपूर्ण प्रकार पत्नीला सांगितला.
‘अटकेतून सुटका’साठी वकिलाकडे
डिजिटल अरेस्टमधून सुटका करून घेण्यासाठी आपण न्यायालयीन लढा लढू, असा धीर पत्नीने ज्येष्ठ नागरिकांना दिला. त्यानुसार पत्नीच्या फोनवरून त्यांनी एका वकिलाची माहिती घेतली. दोघेही शिवाजीनगर येथे त्या वकिलाला भेटण्यासाठी गेले. तेथे त्यांनी संपूर्ण ‘केस’ व डिजिटल अरेस्टची माहिती सांगितली. त्यावेळी वकिलाने हा प्रकार ऐकून “तुमची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे” असे स्पष्ट केले. नंतर त्या वकिलाने ज्येष्ठ नागरिकांना सायबर पोलिसांकडे नेले आणि तक्रार दाखल करण्यास मदत केली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.






