फोटो सौजन्य सोशल मिडिया
हजारो प्रवासी आणि वाहनचालक रस्त्यावरच अडकून पडल्याने त्यांचे प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अन्न-पाण्याविना तासन्तास थांबावे लागत असल्याने प्रवाशांचा संताप वाढला असून, काही ठिकाणी पोलिसांशीही शाब्दिक चकमक झाली.
उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपयांची पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एक हजारांहून अधिक वाहने अडकून पडली आहेत. अवजड वाहने, खासगी मोटारी आणि प्रवासी वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. अनेकांना इच्छित स्थळी पोहोचणे अशक्य झाले असून, विशेषतः लांब पल्ल्याच्या ट्रकचालकांची अवस्था बिकट झाली आहे.
महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानंतर प्रवाशांसमोर अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था किंवा मदत उपलब्ध न झाल्याने प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढली. या परिस्थितीचा फायदा घेत काही विक्रेत्यांनी पाण्याच्या बाटल्यांचे दर वाढविल्याचा आरोप वाहनचालकांनी केला. वीस रुपयांची बाटली पन्नास रुपयांना विकली जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली.
Rajnala Right Canal : कर्जतच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! ४० गावांतील शेतीला मिळणार पाणी
आंदोलनाचा प्रश्न मार्गी लागत नसताना प्रवाशांच्या मदतीसाठीही ठोस पावले उचलली जात नसल्याने वाहनचालकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परिस्थिती हाताळण्यासाठी आलेल्या पोलिसांशी संतप्त वाहनचालकांची जोरदार शाब्दिक चकमक झाली. शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमचा विरोध नाही; मात्र त्यांच्या आंदोलनामुळे अडकलेल्या नागरिकांना पाणी, अन्न आणि सुरक्षिततेची सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, महामार्गावरील वाहतूक कोंडीचा परिणाम व्यापारी मालवाहतुकीवरही झाला आहे. अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न आणि सामान्य प्रवाशांची होणारी परवड यांची सांगड घालत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






