धक्कादायक ! शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने शिक्षकाला भररस्त्यात अडवून मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी (संग्रहित फोटो)
काटोल : शाळेतील विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून एका शिक्षकाला रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना कोंढाळी येथे घडली. यावेळी अश्लील व जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या घटनेमुळे शिक्षकवर्गासह परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश चव्हाण (वय ४४, रा. कोंढाळी) हे एका नामांकित विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून निर्माण झालेल्या प्रकरणात पुरुषोत्तम हगवणे हे शाळेत आले होते. त्यावेळी पालक आणि सहकारी शिक्षकांनी मध्यस्थी करून संबंधित पालकांची समजूत काढली होती. त्यामुळे हे प्रकरण मिटले होते. मात्र, या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून आरोपी पुरुषोत्तम हगवणे (वय ५४, रा. कोंढाळी) याने २ नोव्हेंबर रोजी चारचाकी वाहनाने येऊन शैलेश चव्हाण यांना रस्त्यात अडविले.
‘शाळेच्या प्रकरणात मध्यस्थी करण्याची तुला काय गरज होती?’ असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली आणि गालावर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
स्थानिक नागरिकांनी घटनेचा केला निषेध
३ नोव्हेंबर रोजी स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यात निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला. जातिवाचक शिवीगाळ व मारहाणीच्या आरोपांची दखल घेऊन संबंधित आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार असून, पुढील तपास कोंढाळी पोलिस करत आहेत. शाळेतील वादाचे पडसाद रस्त्यावर उमटल्याने शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
FAQ
प्रश्न 1: शिक्षकाला मारहाण केल्याची घटना कुठे घडली?
उत्तर: नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे ही घटना घडली.
प्रश्न 2: मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव काय आहे?
उत्तर: शैलेश चव्हाण (४४) असे शिक्षकाचे नाव आहे.
प्रश्न 3: शिक्षकाला मारहाण करण्यामागचे कारण काय आहे?
उत्तर: शाळेतील विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून मारहाण केल्याचा आरोप आहे.






