नियमबाह्य फी म्हणून मागितली लाच
अमरावती : शाळेची फी म्हणून लाच रक्कम स्वीकारणाऱ्या, हॉलीक्रॉस हिंदी प्रायमरी शाळेतील मुख्याध्यापिकेसह सहाय्यक शिक्षिकेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. 25) सकाळी साडेदहाच्या सुमारास ताब्यात घेतले. मुख्याध्यापिका संगिता फ्रान्सिस धनवटे (42, रा. टिचर क्वॉटर्स, बडनेरा, जि. अमरावती) व सहाय्यक शिक्षिका अश्विनी विजय देवतार (37, रा. भूमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर रोड, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदार यांचा मुलगा बडनेरातील हॉलीक्रॉस हिंदी प्रायमरी शाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असून, सदरची शाळा ही खाजगी अनुदानित आहे. शाळेस शासनाकडून 100 टक्के अनुदान मिळते, असे असतानाही तक्रारदार यांनी मुलाच्या शिक्षणाची वार्षिक फी 1550 रुपयांपैकी 800 रुपये शाळेला यापूर्वी दिले होते. तर उर्वरित 750 रुपये देणे बाकी होते. याबाबत शाळेच्या वर्गशिक्षिका व मुख्याध्यापिका या तक्रारदाराच्या मुलास वारंवार उर्वरित फीची मागणी करत होते. परंतु, तक्रारदार यांना सदरची नियमबाह्य फी देण्याची मूळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची तक्रार मंगळवारी (दि. 22) एप्रिल रोजी अॅन्टी करप्शन ब्युरोकडे दिली होती.
सदर तक्रारीवरुन बुधवारी (दि. 23) एसीबी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, वर्गशिक्षिका देवतार यांनी तक्रारदार यांना शाळेची नियमबाह्य फी देण्याकरिता प्रोत्साहित केल्याचे आढळून आले. त्यानंतर एसीबी पथकाने शुक्रवारी (दि. 25) शासकीय पंचासमक्ष पडताळणी कारवाई केली असता, मुख्याध्यापिका धनवटे यांनी फीचे 750 रुपये आणून द्या, असे म्हणून शाळेची नियमबाह्य फी म्हणून लाच रक्कम स्विकारण्याची समंती दर्शविली.
सदरची कार्यवाही अॅन्टी करप्शन ब्युरो पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उपअधिक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक भारत जाधव, केतन मांजरे, पोलिस अमंलदार उपेंद्र थोरात, वैभव जायले, शैलेश कडू, चित्रा वानखेडे व चालक पोलिस हवालदार राजेश बहिरट यांनी पार पाडली.
750 रुपयांची लाच स्वीकारताना अटक
एसीबी पथकाने बडनेरा येथील हॉलीक्रॉस हिंदी प्राइमरी शाळेत सापळा रचून आरोपी लोकसेवक धनवटे यांना नियमबाहय फी 750 रुपयांची लाच स्विकारताना रक्कमेसह ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी लोकसेवकांविरुध्द बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली.