संग्रहित फोटो
देवरी : ले-आऊटबाबत अहवाल सादर करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
संदेश बोरकर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणातील तक्रारदार हे देवरी येथील रहिवासी असून, त्यांच्या लेआऊट संदर्भात प्राप्त तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने शुक्रवारी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी दिवसभर कार्यालयाचे कामकाज आटोपल्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास तक्रारदाराने ठरलेली लाचेची रक्कम आरोपी संदेश याला दिली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
हेदेखील वाचा : Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत उगले, अरविंद राऊत, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलिस हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, पोलिस नाईक संतोष शेंडे, अशोक कापसे यांच्यासह इतरांनी केली.
उच्च न्यायालयात याचिका दाखल
तक्रारदाराने उच्च न्यायालयात एक रीट याचिका दाखल आहे. या याचिकेचा अहवाल सादर करण्यासाठी आरोपी संदेश याने तक्रारदाराकडे दीड हजारांची मागणी केली होती. याप्रकरणी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यावर कारवाई करण्यात आली.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : कॅबिनेटमंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला
कोल्हापुरातही लाच प्रकरण समोर
दुसऱ्या एका घटनेत, हुपरी नगरपरिषद अंतर्गत रस्ता कामाचे सुमारे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुरगूड नगरपरिषदेतील नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, मूळ रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुरगूड एसटी बसस्थानक परिसरात 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडले. या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुरगूड परिसरात खळबळ उडाली.






