संग्रहित फोटो
धाराशिव : अनैतिक संबंधाच्या संशयातून ३८ वर्षीय तरुणाला दोघांनी फरशी आणि दगडाने बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार शिवारात घडली. तानाजी शिवाजी गायकवाड असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुरुम पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत अंकुश पांढरे आणि आशिष आण्णाराव गुरुळे (दोघे रा. काटेवाडी, ता. उमरगा) यांनी २९ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून ३० सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत चिंचोली भुयार शिवारातील सर्व्हे क्रमांक ३९ मधील शेतात तानाजी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. फरशी आणि दगडाने केलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच किंवा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
तानाजी गायकवाड यांच्या पत्नीचे आरोपी निशांत पांढरे याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणातून तानाजी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या संशयातून झालेला वाद अखेर मारहाणीपर्यंत पोहोचला आणि त्यात तानाजी यांचा जीव गेला. मृत तानाजी यांच्या आई सोजरबाई शिवाजी गायकवाड (वय ७५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुरुम पोलिस करीत आहेत.






