सौजन्य फोटो - सोशल मिडीया
ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास पुढे सरकत असतानाच पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागत आहेत. मिरा रोड परिसरातून तीन महिलांसह एकूण पाच जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तिन्ही महिलांचा मुख्य संशयित पप्या शिंदे याच्याशी संपर्क असल्याचा संशय असून, हत्येच्या कटात त्यांची काही भूमिका होती का, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांच्या तपासात ताब्यात घेतलेल्या महिलांचा पप्या शिंदे याच्याशी संपर्क असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्णेकर आणि पप्या शिंदे यांच्यात पूर्वी जवळचे संबंध असल्याचेही तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या महिलांचा पूर्णेकर यांच्याशी काही जुना वाद होता का किंवा हत्येपूर्वी त्यांच्यात काही संपर्क झाला होता का, या दिशेने पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान, पप्या शिंदे याला या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली असून, तो पूर्णेकर यांचा पूर्वीचा जवळचा सहकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हल्ल्याच्या वेळी तो घटनास्थळी उपस्थित होता, अशीही पोलिसांची माहिती आहे.
हेही वाचा: Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरासिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तपास करत असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. पथकात सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांसह २३ अधिकारी असल्याचे सांगण्यात आले आहे. हत्येतील आरोपींची भूमिका निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि अन्य उपलब्ध पुराव्यांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी यापूर्वीच अनेक पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली आहेत.
पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी माजी ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येच्या कटात सहभाग असल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुरवणी जबाबात दोघांची नावे घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी हे आरोप फेटाळले असून, आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पप्या शिंदेपासून ते नव्याने ताब्यात घेतलेल्या पाच जणांपर्यंत आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांपर्यंत तपासाचे धागे कोणत्या दिशेने जातात, याकडे लक्ष लागले आहे.
हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कारवाईची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पोलिस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी झाल्यानंतर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मीनाक्षी शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरही सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, हत्येमागील नेमका कट, आरोपींची भूमिका आणि इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग याचा तपास SITकडून सुरू आहे.






