
इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
यंदा पावसाने ओढ दिल्याने बळीराजा अगोदरच संकटात सापडला असून, त्यातच चोरांनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मोटारी व केबल चोरीला गेल्यामुळे पिकांना होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांब हे परिसरातील मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. या भागातील दिलीप कवळे, विश्वास पाटील, नामदेवराव रुपनवर, बापूराव मानकर, चव्हाण यांच्यासह साधारण २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या महागड्या कॉपर वायर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी लंपास केल्या. या घटनेनंतर जांब परिसरात केबल व मोटार चोरीच्या आणखी अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
याशिवाय, काही दिवसांपूर्वीच नजीकच्या निरवांगी परिसरातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बागेतील लाखो रुपयांचे डाळिंब अज्ञात चोरट्यांनी रात्रीत चोरून नेल्याची घटनाही ताजी आहे. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी वालचंदनगर पोलिसांनी ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या मोटारी व केबलचा तात्काळ शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.