
सौजन्य फोटो - सोशल मिडीया
पुणे: कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळसह सर्व आरोपींची विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराने न्यायालयीन सुनावणीदरम्यान मूळ आरोपांपासून माघार घेतली. तसेच इतर साक्षीदार आणि पंचांनीही सरकारी पक्षाच्या आरोपांना दुजोरा न दिल्याने पुराव्याअभावी न्यायालयाने हा निर्णय दिला.
सन २०२० मध्ये निलेश घायवळ कारागृहात असताना संतोष धुमाळ याने फिर्यादीकडे त्याच्या भावाच्या रॅलीसाठी जीप देण्याच्या नावाखाली खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. गुन्हे शाखेने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला होता. त्यानंतर प्रकरणात मोक्काची कारवाई करण्यात आली होती. मात्र, खटल्याच्या सुनावणीदरम्यान तक्रारदाराने पोलिसांच्या दबावाखाली मूळ तक्रार नोंदवण्यात आल्याचा दावा केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवलेल्या जबाबातही त्याने अशी घटना घडली नसल्याचे सांगितले. त्यामुळे सरकारी पक्षाच्या प्रकरणाला महत्त्वाचा धक्का बसला.
या प्रकरणात इतर साक्षीदार तसेच पंच साक्षीदारांनीही सरकारी पक्षाच्या आरोपांना पाठिंबा दिला नाही. उपलब्ध पुराव्यांमधून आरोप सिद्ध होत नसल्याने विशेष मोक्का न्यायालयाने निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, निलेश घायवळ सध्या देशाबाहेर असल्याचे सांगण्यात येते. २०२५ मध्ये कोथरूड परिसरातील गोळीबार आणि हल्ल्याच्या घटनांनंतर पुणे पोलिसांनी घायवळ टोळीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. या कारवाईनंतर घायवळ पोलिसांच्या हाती लागला नसल्याचे वृत्त आहे.
निलेश घायवळ याच्यावर यापूर्वीही विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाल्याचे वृत्त आहे. २०२१ मध्ये पुण्यातील एका दरोड्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. २०२२ मध्ये त्याला न्यायालयाने जामीन मंजूर करताना पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याने पासपोर्ट जमा न करता त्याच पासपोर्टच्या आधारे परदेशात गेल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वीही घायवळने पासपोर्ट अर्जात आडनावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून परदेशात गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. खंडणी प्रकरणात मात्र तक्रारदारासह साक्षीदारांनी आरोपांना दुजोरा न दिल्याने आणि पुरावे अपुरे ठरल्याने न्यायालयाने घायवळसह सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.