प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी बाराच्या सुमारास गव्हाणेवाडी हद्दीत दोन तरुण रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी चारचाकी वाहनातून काही जण तेथे आले. वाहनातून उतरल्यानंतर किंवा वाहनातूनच या तरुणांना लक्ष्य करत गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्लेखोरांनी तीन वेळा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, गोळ्या भरकटल्याने दोन्ही तरुण थोडक्यात बचावले. गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. हल्लेखोरांनी कोणताही वेळ न दवडता चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ज्यांनी गोळीबार केला, त्या दोन्ही गटांतील तरुण पारनेर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, नेमका वाद कशावरून होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
गोळीबारानंतर आरडाओरड झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाहणी केली. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून माहिती संकलित केली जात आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या महामार्गालगत दोन तरुणांवर गोळीबार झाल्याने गव्हाणेवाडी परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.






