हात न लावता स्क्रीन कंट्रोल! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
आतापर्यंत तुम्ही मेटा Quest 3 किंवा Apple Vision Pro बघितले असतील. ते डोक्यावर घातले की खूप जड वाटतात, मोठे दिसतात. तासभर घातले की डोकं दुखायला लागतं. पण फिनिक्स एकदम वेगळा आहे. लीक झालेल्या फोटोत हा हेडसेट अगदी आपण रोज वापरतो त्या चष्म्यासारखा दिसतोय. खूप स्लिम, खूप पातळ. चेहऱ्यावर जाड फोमचा पट्टा नसणार, त्याऐवजी नाकावर टिकणारे छोटे नोज पॅड असणार. त्यामुळे दिवसभर जरी घातला तरी त्रास होणार नाही. याचं वजन फक्त 110 ग्रॅमच्या आत असेल असं बोललं जातं आहे.
हेडसेट इतका हलका कसा केला? यासाठी मेटाने एक भन्नाट शक्कल लढवली आहे. Engadget ने सांगितल्यानुसार, यात बॅटरी आणि प्रोसेसर हेडसेटमध्येच नाही दिले. त्यासाठी एक वेगळा छोटा डब्बा दिला आहे, त्याला Compute Puck म्हणतात. हा पॅक एका वायरने चष्म्याला जोडलेला असेल. तुम्ही तो खिशात ठेवू शकता किंवा बेल्टला लावू शकता. त्यामुळे डोक्यावर फक्त चष्मा राहील आणि सगळं वजन खिशात राहील.या पॅकमध्ये क्वालकॉमचा नवीन Snapdragon Reality Elite चिप बसवला जाणार आहे, जो खूप पॉवरफुल असेल.
या लीकमधली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ज्यांना डोळ्याला नंबर आहे त्यांच्यासाठी. आतापर्यंत VR हेडसेटमध्ये चष्मा घालून बघणं खूप अवघड होतं.पण फिनिक्समध्ये तुम्हाला तुमच्या नंबरचे लेन्स वेगळे लावता येतील. फर्मवेअरच्या व्हिडिओत दाखवलं आहे की तुम्ही मोबाईलने QR कोड स्कॅन करून तुमच्या लेन्सचं सेटिंग करू शकता. यात कुठलंही रिमोट नाही. चष्म्याच्या दोन्ही बाजूला आणि खाली छोटे सेन्सर्स आणि कॅमेरे दिले आहेत. तुम्ही फक्त हाताने इशारा केला किंवा डोळ्यांनी बघितलं तरी स्क्रीन कंट्रोल होईल. म्हणजे हातात काहीही धरायची गरज नाही.
मेटाची दरवर्षी Meta Connect नावाची मोठी परिषद होते. यंदा ती 24-25 सप्टेंबरला आहे. त्या परिषदेत कंपनी या फिनिक्सची पहिली झलक दाखवू शकते पण हा चष्मा दुकानात विकायला यायला अजून वेळ आहे. Reuters च्या बातमीनुसार हा डिव्हाईस प्रत्यक्ष बाजारात 2027 पर्यंत येईल गुगल आणि Xreal सारख्या कंपन्या पण अशाच प्रकारचे हलके चष्मे बनवत आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी मेटाचं हे पाऊल खूप महत्त्वाचं आहे. जर हा 110 ग्रॅमचा चष्मा खरंच आला तर VR आणि AR ची दुनिया पूर्णपणे बदलून जाईल.






