
निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष दाखवले अन् फसवणूक केली
नागपूर : शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास दररोज पाच टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर ठकबाजांनी निवृत्त बँक व्यवस्थापकाला १४ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी शहर सायबर पोलिसांनी पीडिताच्या तक्रारीवरून संजय सिंह आणि राणी देशमुख यांच्याविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
११ जून रोजी पीडिताला समूहाची लिंक व्हॉट्सअॅपवर मिळाली. या समूहाचे प्रशासक संजय सिंह आणि राणी देशमुख हे शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात माहिती देत होते. आरोपींनी ‘बीएनपी परिभास सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाचे बनावट सेबी नोंदणी प्रमाणपत्रही प्रसारित केले. या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दररोज पाच टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यामुळे पीडिताचा विश्वास बसला.
Ashok Kharat Case : अशोक खरातबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर; सरकारी डॉक्टरला सोबत घेऊन…
आरोपींनी एक लिंक पाठवून त्याद्वारे गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेतून नफ्याची रक्कम पीडिताच्या खात्यात जमा केली. त्यामुळे आरोपींवरील विश्वास अधिकच वाढला. त्यानंतर पीडिताने वेगवेगळ्या टप्प्यांत आपल्या बँक खात्यातून एकूण १४ लाख रुपये कथित कंपनीमार्फत बाजारात गुंतवले.
पैसे परत करण्यास नकार
काही दिवसांनी वैद्यकीय कारणासाठी पीडित व्यक्तीला गुंतवणुकीतील चार लाख रुपये काढायचे होते. मात्र, आरोपींनी ही रक्कम प्रारंभिक समभाग विक्री प्रक्रियेत अडकल्याचे सांगत पैसे परत करण्यास नकार दिला. वारंवार टाळाटाळ केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडिताच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रथम ऑनलाइन तक्रार नोंदवली. याप्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
महिला क्रिकेटरने उकळले 63 लाख रुपये
फसवणूकीचे प्रकार वाढत असतानाच आता यात आणखी एका मोठ्या घटनेची नोंद झाली आहे. मुंबईतील उद्योगपतीला आपल्या जाळ्यात अडकवून एका महिला क्रिकेटपटूने तब्बल ६३ लाख रुपये लुटले. यासंबंधित मुंबई पोलिसांनी आता महिला क्रिकेटपटू आणि तिच्या भावाला अटक केली आहे. माहितीनुसार, त्यांनी दिल्लीतील एका हाॅटेलमधून ताब्यात घेण्यात आलं. तर त्यांच्या आणखी एका साथीदाराला जम्मू आणि काश्मीर येथील श्रीनगर येथून ताब्यात घेण्यात आलं.