File Photo : Fake Shopping App
अमरावती : भरघोस डिस्काउंट, तातडीची उपलब्धता यांसारख्या कारणांमुळे ऑनलाईन खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जात आहे. यामुळे फसवणूकही अनेकदा होऊ शकते. अशीच फसवणूक होत असल्याचे मोर्शीमध्ये समोर आले आहे. शहरातील गेडामपुरा येथे राहणारे संजय उल्हे यांनी एका नामांकित कंपनीचे ऑनलाईन बूट पाहून एका कंपनीला ऑर्डरसुद्धा दिली.
हेदेखील वाचा : सायबर गुन्हेगारांचा व्यापाऱ्याला गंडा; तब्बल 95 लाखांची केली फसवणूक, पोलिसांत तक्रार येताच…
काही दिवसांत त्यांच्या घरी ऑनलाईन नामांकित कंपनीकडून पार्सल आले. त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यामध्ये त्यांना फाटक्या चपलांची जोडी आढळून आली. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. ई-कॉमर्सच्या साईटही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आपल्याला आता कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जावे लागत नाही. घरपोच वस्तू काही तासात मिळतात. यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
दरम्यान, संजय उल्हे यांनी तुटल्या व फाटक्या चपला पाहताच त्यांनी ते पार्सल परत पाठवायचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे कंपनीकडून फाटक्या चपला या बॉक्समध्ये पार्सल करून पाठवू शकत नाही. त्यामुळे मध्यातच कोणीतरी जोडे काढून त्यात चपला टाकल्या असेल, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
ऑनलाईन शॉपिंग सोयीस्कर पण…
ऑनलाईन शॉपिंग सोयीस्कर आहे, यामध्ये तुम्ही घरबसल्या आरामात खरेदी करू शकता आणि सवलत देखील मिळवू शकता. त्यामुळे नागरिक ऑनलाईन खरेदीला पसंती देतात. परंतु, ऑनलाइन खरेदी करताना अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर येत असल्याने ऑनलाईनपासून सावध राहावे व काळजी घ्यावी, असे आवाहनसुद्धा उल्हे यांनी केले आहे.
सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये होतंय वाढ
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी धुळ्याच्या अवधान येथील महाराष्ट्र ऑईल एक्सट्रक्शन प्रा.लि. कंपनीचे संचालक असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याला तब्बल ९५ लाखांना गंडविल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी नाशिक येथील तिघांना जेरबंद केले आहे.
हेदेखील वाचा : पुण्यात नक्की काय चाललंय? मध्यवर्ती भागात बनावट नोटा आढळल्याने खळबळ; गुजरातमधील एकाला अटक