सौजन्य फोटो - सोशल मिडीया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेतील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. राणू कृष्णा हलामी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. काल संध्याकाळी वसतिगृहातील खोलीत तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृत विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नसल्याने तिला घरी जायचे होते. मात्र, वसतिगृहाच्या अधीक्षिका दिपाली चांभाळे यांनी तिला खोलीत बंद केल्याचा गंभीर आरोप तिच्या पालकांनी केला आहे. या प्रकारामुळे राणूवर मानसिक तणाव निर्माण झाल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच कुटुंबाला २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मृत विद्यार्थिनीचे वडील कृष्णा चिनू हलामी आणि आई मनीषा हलामी यांनी केली आहे.
हेही वाचा: Solapur Crime News: २० एकर जमिनीवरून सांगोल्यात खळबळ; माजी आमदार आणि मुलावर गंभीर आरोप
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांनी आज कुरखेडा येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांची बाजू जाणून घेतली. पालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांची दखल घेत मंत्र्यांनी आश्रमशाळा व्यवस्थापनासह आदिवासी विकास विभागाच्या स्थानिक यंत्रणेची कानउघाडणी केली. तसेच वसतिगृह अधीक्षिकेला निलंबित करण्याचे आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, त्यांच्या तक्रारींची दखल आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राणूच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, पालकांनी केलेल्या आरोपांत कितपत तथ्य आहे आणि चौकशीतून कोण जबाबदार ठरते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






