मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा बायपास मार्गावर शिवाजीनगर भागात हॉटेल लाल किल्ला आहे. या हॉटेल परिसरात अज्ञातांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. हा परिसर तसा वर्दळीचा त्यामुळे गोळीबाराच्या आवाजाने नागरिकांची पळापळ सुरु झाली. मात्र या अंदाधुंद गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघं जण गंभीर जखमी आहेत. या जमखींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या तिघांची प्रकती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या सगळ्या प्रकरणाने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रकरणाची चौकशी सुरु असून पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा गँगवॉर असल्याचा संशय व्यक्त केला जातो. प्रकणाचा तपास सुरु असून अद्याप पोलीसांच्य़ा हाती ठोस कारण लागलं नसलं तरी, गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याच्या घटना घडत आहेत. तसंच या टोळ्यांमध्ये वाद वितंड सुरु असल्याने हा गोळीबार त्यातूनच झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली. या सगळ्याचा तपास जलदगतीने सुरु असल्य़ाचं सांगण्यात आलेलं आहे. ठाणे परिसरात सध्या गुन्हेगारी वाढत असल्याचं समोर आलं येत आहे. मागच्या आठवड्यात देखील असाच काहीसा प्रकार घडला होता. 27 मार्च रोजी देखील पाचपाखाडी भागात गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळालं. या गोळीबारात कोणतीही जखमी झालं नाही पण दहशतीचं वातावरण निर्माण झालं. पाचपाखाडी परिसर असो किंवा मुंब्राबायपास गोळीबाराच्या प्ररणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.






