संभाजीनगरमध्ये ग्रामसेविकेवर अत्याचार; विविध ठिकाणी नेत अश्लील व्हिडिओ, फोटही काढले (फोटो सौजन्य: iStock)
जत : जत तालुक्यातील एका गावातील आश्रमशाळेतील काही मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. पण, याबाबत पोलिस ठाण्यात मात्र कोणतीही नोंद झालेली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून, मुलींचे पालक दबावाखाली असल्याचे समजते.
तालुक्यातील एका गावातील आश्रमशाळेत सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील मुले-मुली शिक्षण घेत आहेत. या शाळेतील एकाने मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची चर्चा सुरू आहे. चार ते सहा मुलींवर अत्याचार झाल्याचे समजते. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेतील मुलींना घरी सोडण्यासाठी गेल्यानंतर पालकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्या नराधमाला पालक व गावकऱ्यांनीही चोप दिल्याचे समजते.
दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलिस प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. पालकांनी पोलिसांत तक्रार केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधितांनी हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सामाजिक संघटनांनी उठवला आवाज
काही सामाजिक संघटनांनी लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठविला आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापणार आहे. यापूर्वीही शाळेत अत्याचार झाल्याची घटना घडली होती, पण ती परस्परच मिटविण्यात आली. त्यामुळे संबंधितांचे धाडस वाढल्याचे सांगितले जात आहे. समाजकल्याण विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे. याबाबत काहींनी लोकप्रतिनिधींनाही माहिती दिली आहे. राजकीय पक्षाचे नेतेही यावर मौन पाळून आहेत. मुलींचे पालकही दबावाखाली असल्याचे समजते.
दोषी आढळल्यास कारवाई : संस्थाचालक
याबाबत संबंधित शाळेच्या संस्थाचालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला नाही. समाजमाध्यमातूनच ही बाब समजली असून, शुक्रवारी संस्थेतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करणार आहोत. यात कोणीही दोषी आढळल्यास त्याला संस्था पाठीशी घालणार नाही. दोषींना कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशीच संस्थेची भूमिका राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांचे पथक आश्रमशाळेत
आश्रमशाळा अत्याचारप्रकरणी तपासासाठी सनमडी आश्रमशाळेमध्ये पोलीस अधिकारी व धनश्री भांबुरे, सहाय्यक संचालक इतर बहुजन समाज कल्याण सांगली, निरीक्षक गायत्री फडणीस हे दाखल झाल्या आहेत. शाळेची चौकशी सुरू असून, गावकर्यांमध्ये संताप दिसून येते आहे. या चौकशीतून संबंधित संस्थेचे व संबंधित शिक्षक स्टाफचे अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. संस्थेचे चेअरमन हजर असून, संबंधित मुख्याध्यापक मात्र गैरहजर आहेत.