दाम्पत्याला फसवून लुटले
संभाजीनगर : पैठण रोडवरील मातोश्री हॉस्पिटलजवळ एका दाम्पत्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दाम्पत्याला फसवले. याप्रकरणी मधुकर बापूराव कोळेकर (वय ६६, रा. पैठण रोड) यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, नक्षत्रवाडी बाजार करून घरी परतताना दोन दुचाकीस्वार त्यांच्या समोर थांबले, त्यांनी स्वतःला पोलिस अधिकारी सांगत आयकार्ड दाखवले आणि तुमच्या अंगठीचा नंबर तपासतो असे म्हणत सोन्याची अंगठी घेतली. काही क्षणातच अंगठी परत देण्याच्या बहाण्याने ती हिसकावून दोघे पळून गेले. चोरी केलेली अंगठी ५ ग्रॅम वजनाची असून, सुमारे ६० हजार रुपयांची आहे. सदर प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने पाच जणांना तब्बल 50 लाखांना गंडा; नोकरीचे बनावट पत्र दिले अन् नंतर…
दरम्यान, शहरात खासगी तसेच प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले तरी चोरट्यांनी आता नवे मार्ग शोधले आहेत. तपासात समोर आले आहे की, चोरट्यांनी अशा भागांची निवड केली, जिथून सुमारे ५०० मीटर अंतरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. अशा जागा निवडून ते सांगोपांग नियोजन करून फसवणुकीच्या आणि हिसकावणीच्या घटना घडवत आहेत.
चोरट्यांची ओळख पटवणे ठरतंय आव्हान
परिणामी, त्यांच्या हालचालींची नोंद सीसीटीव्हीत होत नसल्याने ओळख पटवणे कठीण जात आहे. पोलिसांकडून या भागांमध्ये सीसीटीव्ही नेटवर्क वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून स्थानिक नागरिकांनाही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा
भारतीय रेल्वेत विविध पदांवर नोकरी लावून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून पाच जणांची फसवणूक करण्यात आली. या पाच जणांना सेंट्रल रेल्वेचे नोकरी लागल्याचे बनावट जॉईन पत्र देऊन नाशिकरोडच्या दोघांनी सुमारे 50 लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहता फसवणूक झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.