रेल्वेत नोकरीच्या नावाखाली ५० लाखांना गंडा (संग्रहित फोटो)
नाशिक : भारतीय रेल्वेत विविध पदांवर नोकरी लावून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून पाच जणांची फसवणूक करण्यात आली. या पाच जणांना सेंट्रल रेल्वेचे नोकरी लागल्याचे बनावट जॉईन पत्र देऊन नाशिकरोडच्या दोघांनी सुमारे 50 लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहता फसवणूक झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी देवळाली कॅम्प येथील संतोष चंद्रकांत कटारे, संतोष शिवराम गायकवाड या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांना हेरून त्यांना रेल्वेच्या विविध पदांवर नोकरी देण्यासाठी पैसे गोळा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सख्ख्या भावांना साडेसोळा लाखांना फसवले
दुसऱ्या घटनेत जेलरोड येथील श्रीकांत रमेश पाटील व त्यांचा लहान भाऊ या दोघांना ऑगस्ट २०२० मध्ये रेल्वेत नोकरीचे बनावट पत्र दिले व त्यापोटी १६ लाख, ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. तिसऱ्या घटनेत उपनगर येथील मयुर कांबळे यास ऑगस्ट २०२२ मध्ये मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असून, त्याचे पुरावे म्हणून विविध अधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्रे दाखवून आपण बऱ्याच मुलांना रेल्वेत नोकरी लावून दिल्याचे सांगितले.
वैद्यकीय तपासणीचे बनावट पत्रही दिले
मयुर कांबळे, त्याचा भाऊ अशा दोघांना मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील बनावट वैद्यकीय तपासणीचे पत्र दिले. तसेच मुंबईतील सीएसटी रेल्वेच्या एका कार्यालयात नेले. तेथे रेल्वे नोकरीचे जॉईन होण्याचे पत्र दिले. प्रत्यक्षात कांबळे यांनी रेल्वेशी संपर्क साधला असता सदरची कागदपत्रे बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. या मोबदल्यात आरोपींनी त्याच्याकडून १४ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या तिन्ही घटनेत देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भारत सरकारची राजमुद्रा असलेले पत्रही तयार
जेलरोड येथे राहणारे सोनवणे यांची बहिण संगिता हीस रेल्वेच्या सी ग्रुपमध्ये तर फिर्यादीचा मामा चेतन वानखेडे यास ग्रुप डीमध्ये नोकरी लावून देण्यासाठी भारत सरकारची राजमुद्रा असलेले पत्र तयार केले. त्यावर ‘मिनिस्ट्री ऑफ रेल्वे’चा बनावट शिक्का मारून पर्सनल असिस्टंट यांची स्वाक्षरीचे पत्र दिले. या दोघांकडून १९ लाख, ५० हजाराची रक्कम घेतली. प्रत्यक्षात उमेदवारांनी चौकशी केली असता, सदरचे पत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे.
हेदेखील वाचा : नोकरीच्या आमिषाने मामेभावालाच गंडा; तब्बल 12 लाखांची केली फसवणूक