
चहा उशिरा दिला म्हणून बायकोला केली मारहाण
दापोली पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल
किरकोळ कारणाचे भांडणात रूपांतर
दापोली: चहा आणि नाश्ता बनवण्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना दापोली येथील नॅशनल हायस्कूल जवळ असलेल्या असिया प्लाझा येथे घडली. चहा आणि पाव फ्राय उशिरा का दिला, या रागातून पतीने आपल्या पत्नीला हाताने व कुकरने पाठीवर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पीडित पत्नी असमा मुनिफ खलपे (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मुनिफ अब्दुलगनी खलपे याच्याविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० मार्च २०२६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी असमा खलपे या घरात काम करत असताना, त्यांचे पती मुनिफ यांनी त्यांना चहा आणि पाव फ्राय करून मागितला. असमा यांनी चहा आणि नाश्ता दिल्यानंतर ‘पाव फ्राय उशिरा का दिला’ असे म्हणून मुनिफ यांनी त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर रागाच्या भरात मुनिफ यांनी किचनमधील कुकर उचलून असमा यांच्या पाठीवर तीन-चार वेळा जोरात प्रहार केले. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर असमा यांनी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे वैद्यकीय तपासणी करून पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मुनिफ अब्दुलगनी खलपे याच्याविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड तपास करत आहेत.
Fire News: खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक; तांबे कुटुंबावर आले मोठे संकट
खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक
खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत रशीद तांबे यांचे राहते घर पूर्णपणे भस्मसात झाले आहे. रात्रीच्या वेळी अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच तिने संपूर्ण घराला वेढा घातला. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र घरातील संसारोपयोगी वस्तू, फर्निचर, कपडे, कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
तांबे कुटुंबावर कोसळले मोठे आर्थिक संकट
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवानही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. रविवारी मध्यरात्रीपर्यंत नागरिक आणि अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी झटत होते. आगीची तीव्रता मोठी असल्याने घरातील बहुतांश सामान वाचवता आले नाही.