सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील टाटा गार्डन चौकात घडली आहे. याप्रकरणी पीएमपी चालकावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक देवबहाद्दुर घर्ती (वय ३२, रा. आनंद पार्क, गणेशनगर, वडगाव शेरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी चालक रवींद्र गेनबा गायकवाड (वय ४०, रा. श्री स्वामी समर्थ हाइट्स, आंबेगाव पठार, धनकवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अशोक घर्ती यांचा भाऊ गोपाल (वय ३३) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अशोक घर्ती बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाला होता. चंदनगर भागातील टाटा गार्डन चौकात भरधाव पीएमपी बसने दुचाकीस्वार घर्ती यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या घर्ती यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. नगर रस्ता वर्दळीचा असून, या रस्त्यावर गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. बहुतांश अपघात वेग आणि वाहनचालकांच्या चुकांमुळे होतात.
टेम्पोने तिघांना उडविले
पुण्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत आहेत. अशाताचं गेल्या काही दिवसाखाली सातारा-पुणे महामार्गावरील मांगडेवाडी गावाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला महिला पतीसह मैत्रिणीशी गप्पा मारत उभा असताना भरधाव पॅगो टेम्पोने उडविले. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर दाम्पत्य जखमी झाले आहेत. दिपाली वैभव बर्गे (वय ४५) अशी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, आदीनाथ वायदंडे (वय ५९) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पार्वती वायदंडे (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. ९ नोव्हेंबर रोजी पावणे आठच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
हे सुद्धा वाचा : व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; सिंहगड रोड पोलिसांनी ७२ सिलेंडर केले जप्त
पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक
सोलापूर-पुणे रस्त्यावर भल्या पहाटे वाहन तपासणीसाठी नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. तर, दुचाकी चालक तरुणासह त्याची मैत्रिण देखील जखमी झाली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, मोटारचालक चेतन सिंग, दुचाकीवरील सहप्रवासी सायली टिंगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मनोहर भाऊ ओंबासे (वय ३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.